प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम Parasbaag in schools under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये
परसबाग उपक्रम
Parasbaag in schools under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण
योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला
व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९
रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत
उपक्रम सर्व शाळांस्तरावर राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच,
परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट
परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला,
फळे इत्यादींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करुन विद्यार्थ्यांना
देण्यात येत आहेत. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण
व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर
व्हावे, असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत
आहेत. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील काही शाळांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे
सदर उपक्रम राबविला जात नसल्याचे दिसून येत आहे. शाळांमध्ये कमी जागेमध्येही विविध
पर्यायाद्वारे सदर उपक्रम राबविण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या
आहेत. त्यानुषंगाने राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करणे व सदर
परसबागांमध्ये लागवड करण्यात येणाऱ्या भाजीपाला याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही
करण्यात यावी.
१) केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील शाळांमध्ये
परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला या पदार्थांचा वापर
शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.
२) शाळांमधील उपलब्ध जागा विचारात घेवून परसबागांची
निर्मिती करण्यात यावी. सदर परसबागांमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या
भाजीपाला यांची लागवड करण्यात यावी.
३) परसबागेसाठी आवश्यक जागेची मर्यादा विचारात घेता कमी
जागेमध्ये व कमी दिवसात तयार होणारा पौष्टीक व अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाला
(मायक्रोग्रीन) हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. याबाबतची सर्वसाधारण माहिती व फोटो
सोबतच्या परिशिष्टात समाविष्ट केलेली आहे.
४) विद्यार्थ्यांचा वयोगट विचारात घवून शाळांमध्ये परसबाग
सेंद्रीय पध्दतीने निर्माण करावी. विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ
अशी पर्यावरण पूरक खते तयार करण्यास शिकविण्यात यावी.
५) प्रस्तुत उपक्रमाकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान
केंद्र,
कृषि शाळा, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या
अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य
घेण्यात यावे.
६) शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याकरीता केंद्र शासनाने दि.१५ ऑक्टोंबर, २०१९ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात यावे.
परिशिष्ट
अल्पकालीन भाजीपाला (मायक्रोग्रीन्स) म्हणजे मोड आलेल्या
धान्याच्या पुढची आणि छोट्या रोपांच्याही अलिकडली अवस्था. (रुजलेल्या बियाणाला जी
पहिली दोन पाने येतात ती आणि त्यानंतरची जास्तीत जास्त दोन पाने आलेल्या अवस्थेला
जो कोंब असतो.)
भाजीपाला :- अल्पकालीन भाजीपाल्याची लागवड
कोणत्याही हंगामात करता येऊ शकते. यामध्ये अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाला
(मायक्रोग्रीन) मध्ये मेथी, वाल, हरभरा, मूग, बीट, मका, मुळा, मोहरी, सूर्यफूल,
कांदा, वाटाणा, चवळी,
पालक, राजमा, गहू
(गव्हांकूर) इत्यादींची लागवड करता येते.
सर्वसाधारण लागवड पध्दत:- अल्पकालीन
भाजीपाला लागवड कमी जागेत म्हणजे शाळेच्या टेरेसवर, सुरक्षा भिंतीच्या
शेजारी एक ते दोन फूट रुंदीचे वाफे तयार करुन करता येते. तसेच लहान कुंडया,
छोटे ट्रे यामध्येही सदर लागवड करुन भाजीपाला उत्पादन घेता येते.
सदर अल्पकालीन भाजीपाला सुमारे ३ ते ४ इंच खोलीच्या माती, वाळू,
लहान रेती, कोकोपीट इत्यादी मध्ये लावता येतो.
लागवड केलेल्या मातीतून पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते. लागवडीसाठी स्वच्छ पाणी
वापरावे.
अल्पकालीन भाजीपाला काढण्याचा कालावधी व पध्दत :- पौष्टीक
अल्पकालीन पालेभाज्या (मायक्रोग्रीन) कमी कालावधीत म्हणजे ७ ते १० दिवसात तयार
होतात. बियाणाची रुजवण झाल्यावर दोन ते तीन दिवसांत अंकुर व मुळे येतात. त्यानंतर
बियाणाच्या दलासोबत दोन कोवळी पाने येतात. त्यानंतर काही कालावधीत अजून दोन पाने
येतात. साधारण यावेळी हा सूक्ष्म भाजीपाला तयार होतो. सदर भाजीचे कोवळे खोड, बियाणाची
दले आणि दोन व चार कोवळी पाने हा जमिनीवरील भाग भाजी करण्यासाठी वापरण्यात येतो.
पाणी दिल्याने रोपे काढणे सहज शक्य होते. त्यामुळे भाजी तयार झाल्यावर पाणी देऊन
रोपे उपटून काढावी. सदर रोपांची मुळे व्यवस्थित कापावीत. भाजी हलकेच स्वच्छ धुवावी
व मुळांचा भाग काढून टाकावा. जमिनीवरील भाजीचा भाग पाण्याने स्वच्छ करुन वापरावा.
दुसरी पध्दत म्हणजे जमिनीवरील भाग कात्रीने कापून घ्यावा व सदर भाग पाण्याने स्वच्छ करुन वापरावा. त्यानंतर काही कालावधीनंतर पाने परत आल्यास पुढच्या वेळी वापरता येतील.
मायक्रोग्रीन्समधील पोषकतत्वे:
मायक्रोग्रीन्समध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.
त्यांच्यातील पोषक घटक अर्क स्वरुपात असतात. पूर्णपणे वाढलेल्या भाज्यांच्या
तुलनेत सूक्ष्म जीवनसत्वे, क्षार व अँटि-ऑक्सिडंट्सची पातळी अधिक
असते.
प्रत्येक मायक्रोग्रीनमधील पोषक घटकांमध्ये थोडाफार फरक असला तरी बहुतेक प्रकारांमध्ये पोटॅशिअम, लोह, झिंक, मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक मुबलक प्रमाणात असतात.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS