Krantijyoti Savitribai Phule,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
(दि. ३ जानेवारी १८३१-१० मार्च
१८९७१- (अल्प परिचय)
भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य
प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री त्यांचा जन्म सातारा
जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई यांचा विवाह सन
१८४० मध्ये जोतीराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर जोतीरावांनी त्यांना
घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. दि. १ जानेवारी १८४८ रोजी जोतीरावांनी
पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाडयात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू
केली आणि सावित्रीबाई वयाच्या १७ व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू
लागल्या. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. काही
धर्ममार्तंडांनी धर्म बुडाला अशी ओरड केली व ते सावित्रीबाईंवर धर्मबुडवी म्हणून
शेणमाती फेकू लागले. तरी सुध्दा सर्व विरोधाला धैर्याने तोंड देत त्यांनी आपली
आगेकूच चालूच ठेवली...सन १८५१ मध्ये फुले दांपत्याने चिपळूणकरांच्या वाड्यातील आणि
रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना केली. दि. १० सप्टेंबर १८५३ या दिवशी
जोतीरावांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह मागासवर्गीय लोकांस विद्या शिकविण्याकरिता
मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. सन १८६३ साली जोतीराव व सावित्रीबाईनी
गंजपेठेतील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या
प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. त्यातीलच एका काशीबाई नावाच्या विधवेचा यशवंत नामक
मुलगा फुले दांपत्याने दत्तक घेतला. समता, स्वातंत्र्य आणि विवेकनिष्ठा या तत्त्वांवर आधारित नवा
आधुनिक समाज निर्माण करण्याचे जोतीरावांचे ध्येय होते. त्यासाठी दि. २४ सप्टेंबर
१८७३ रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दि.२८ नोव्हेंबर १८९० रोजी
जोतीरावांचे निधन झाले. जोतीरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची धुरा
आपल्या खांद्यावर घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. सन १८९३ साली सासवड येथे
झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.सन १८७६-७७ आणि सन १८९६ या
काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या वेळी सावित्रीबाईनी गोरगरिबांना
खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून सुमारे २०००
मुलामुलींची भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. सन १८९७ पासून पुण्यात प्लेगची साथ
आली, तेव्हा मृत्यूला
न घाबरता सावित्रीबाईनी प्लेगबाधित रुग्णांची सेवाशुश्रूषा केली; पण अखेर त्यांना प्लेगची बाधा होऊन
त्यातच त्यांचे दुर्देवी निधन झाले.सावित्रीबाई या एक प्रतिभासंपन्न कवयित्री
होत्या. मात्र दीर्घकाळ त्यांचे साहित्य महाराष्ट्राला ज्ञात नव्हते. सन १९८८
मध्ये अभ्यासक डॉ. मा. गो. माळी यांनी सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या
ग्रंथाद्वारे ते प्रकाशात आणले. सावित्रीबाईच्या काव्यफुले (१८५४) या
काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. सावित्रीबाईंचा दुसरा कवितासंग्रह बावनकशी
सुबोध रत्नाकर (१८९२) म्हणजे जोतीरावांचे काव्यमय असे आद्यचरित्रच होय. या
कवितासंग्रहामध्ये वैदिक काळ ते इंग्रजी राजवट आणि फुलेंची चळवळ असा भारतीय
इतिहासाचा मोठा पट सावित्रीबाईंनी मांडला आहे. सावित्रीबाईंच्या सामाजिक
कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून सन १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन
बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या कार्याचे क्रांतिकारी स्वरूप
लक्षात घेऊन त्यांना क्रांतिज्योती ही उपाधी दिली गेली. तसेच दि. ९ ऑगस्ट २०१४ या
दिवशी पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS